94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलन झाले. नंतर पुढे काय? हा प्रश्न मला पडला. तो सोडविण्यासाठी ‘वाचन’ प्रक्रियेवर भर दिला पाहिजे हे वाटले. त्यातून कविवर्य कुसुमाग्रजांचा ‘विशाखा’ या कवितासंग्रह वाचल्यानंतर जे मला वाटले ते आपल्यासमोर मांडले आहे. आपल्याही या संग्रहाबद्दलच्या काही प्रतिक्रिया असल्यास त्या नक्की लिहा. भाषेसाठी, साहित्यासाठी हे जरूर करायला हवे.

94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्यानिमित्ताने विचार करताना वेगवेगळ्या साहित्य प्रकारांच्या अनुषंगाने पुस्तके डोळ्यासमोरून जात होती. आलेल्या मान्यवरांना कोणती पुस्तके भेट द्यावीत यावरही काम सुरू होते. त्यात इतर पुस्तकांबरोबर एक पुस्तक नक्की द्यायचे ठरले ते म्हणजे कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा ‘विशाखा’ हा कवितासंग्रह. जी पुस्तके आपण घेणार आहोत ती निदान आपण तरी वाचलेली हवीत, या भावनेने ‘विशाखा’ हा संग्रह वाचायला घेतला आणि त्यातल्या प्रत्येक कवितेने एक स्वतंत्र विचार द्यायला सुरुवात केली. 57 कवितांचा हा संग्रह स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर अशा दोन्ही काळातील सामाजिक, सांस्कृतिक, व्यक्तीविषयक, मानसिक आंदोलने स्पष्ट करीत जातो. एक चित्रकार म्हणून विचार करताना मला प्रत्येक कवितेगणिक वाटत राहिली ती कुसुमाग्रजांची ‘चित्रमय शैली’. या शैलीमुळे माझ्यावर या कविता विशेष परिणाम करणार्या ठरल्या. शब्दांच्या पाठीमागे असलेला अर्थ हा कधीही एकच प्रकारचा असत नाही. काळानुरूप आणि परिस्थितीनुरूप ते अर्थ बदलत जातात. चित्र काढताना माझ्या मनात असणारा विचार जो असतो तोच चित्रातून पाहाणार्याला कळतो, समजतो असे नाही. तर तो त्याचा नवा अर्थ त्याच्या पद्धतीने लावण्याचा प्रयत्न करीत असतो. ‘विशाखा’ हा संग्रह वाचतानादेखील मी माझ्या पद्धतीने ज्यावेळी या कवितांचा अर्थ लक्षात घेत होते त्यावेळी आनंद होत होता.
‘दूर मनोर्यात’ ही पहिली कविता आणि ‘समिधाच सख्या या-’ ही शेवटची कविता या संपूर्ण संग्रहाला बांधून ठेवते. पहिल्या कवितेतील पहिलाच शब्द ‘वादळला’ हा आहे. ‘वादळ हा मूळ शब्द; मात्र त्याला कुसुमाग्रजांनी दिलेले हे नवे रूप किती वेगळेपणाने परिस्थितीला समोर आणणारे आहे. आगगाडी आणि जमीन, अहिनकुल, टिळकांच्या पुतळ्याजवळ, जालियनवाला बाग, क्रांतीचा जयजयकार, कोलंबसाचे गर्वगीत, पृथ्वीचे प्रेमगीत, उमर खय्याम, पावनखिंडीत या कवितांनी माझे लक्ष पुन्हा पुन्हा वेधून घेतले.
सरणार कधी रण प्रभु तरी हे कुठवर साहू घाव शिरी!
या 1932 साली लिहिलेल्या ‘पावनखिंडीत’ नावाच्या कवितेतील पहिल्या दोन ओळी आहेत. आजही हा इतिहास नुसता आठवला तरी आपल्या अंगावर रोमांच उभे राहाते. ती किमया या संपूर्ण कवितेत कुसुमाग्रजांनी साधली असल्याचे मला जाणवले.
Коментари