top of page
Search

बारामतीचा अभ्यासदौरा...

Updated: May 23, 2023



बारामतीचे नुसते नाव समोर आले की, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे नाव आपोआप तोंडून निघाल्याशिवाय राहत नाही. महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीत पवार कुटुंबियांचे अतिशय मोलाचे योगदान आहे. नुकताच मला बारामतीला जाण्याचा योग आला. MET-BHUJBAL KNOWLEDGE CITY ADGAON- NASHIK ची टीम बरोबर घेऊन मी या अभ्यास दौऱ्याला सुरुवात केली; कारण होते ते तिथे असलेल्या शैक्षणिक सोयी-सुविधा जाणून घेण्याचे. एखादी संस्था चालवत असताना वैचारिक आणि प्रत्यक्ष पातळीवर अनेकदा अनेक प्रश्न निर्माण होत असतात. त्यांचे निराकरण करण्यासाठी अशा प्रकारच्या अभ्यास दौऱ्यांचा फायदा मोठा होतो. हेच विचार मनात घेऊन बारमतीत पोहोचलो. बारामतीच्या या शैक्षणिक संकुलाची अलौकिक वाटचाल पाहतांना काही गोष्टी आवर्जून सांगाव्याश्या वाटतात... जातानाच दिसत होते ते विकासाचे नवे दीपस्तंभ. तिथे गेल्यावर असे समजले की, बारामतीतील जमीन अत्यंत खडकाळ होती. पाण्याचे दुर्भक्ष्य होते; मात्र पहिल्यापासूनच शेतकऱ्याप्रती आस्था असलेल्या पवारसाहेबांनी, आपल्या देशाचा, राज्याचा पोशिंदा जगला पाहिजे, मोठा झाला पाहिजे यासाठी स्वप्न पाहिली. म्हणूनच आदरणीय शरदचंद्र पवार साहेब देशाच्या विकासासाठी राजकीय, सामाजिक क्षेत्रात व्यग्र असतांना देखील त्यांनी सन १९७१ साली स्थापन करण्यात आलेल्या Agricultural Development Trust (ADT) या संकुलाची जबाबदारी आपले थोरले बंधू अप्पासाहेब पवार यांच्या खांद्यावर सोपवली. सन १९७६ पासून स्वतः अप्पासाहेबांनी या संस्थेमध्ये अधिक लक्ष घालून कामास सुरुवात केली. अप्पासाहेबांसमोर ओसाड माळरानाचे नंदनवन करण्याची जबाबदारी होती. त्याच्या पूर्तीमध्ये मात्र मोठे अडथळे होते. त्यावर मात करत त्यांनी संस्थेचे काम अविरतपणे सुरू ठेवले. विविध देशांच्या शेतीविषयक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून त्याचा वापर अप्पासाहेबांनी संस्थेच्या कामात केला. पुढे जाऊन अप्पासाहेबांचे हेच काम त्यांचे सुपुत्र श्री. राजेंद्र पवार यांनी आजही सुरु ठेवले आहे. बघताबघता या एका छोट्याशा रोपट्याचे महाकाय वटवृक्षात रूपातंर झाले 'शेती' हा विषय पवार घराण्याचा कायमच आवडीचा आहे. त्याहीपलीकडे जाऊन सांगायचे झाले, तर श्रद्धेचा राहीला आहे. पारंपरिक शेती, त्यातून मिळणारे उत्पन्न आणि त्यामुळे शेतकऱ्यांची होणारी बिकट परिस्थिती हा नेहमीच चर्चेचा मुद्दा असतो; पण नुसती चर्चा न करता प्रत्यक्ष कामावर दिलेला भर म्हणजे पवार साहेब, अप्पासाहेब आणि श्री.राजेंद्र पवार यांचे काम. शेतीविषयी किती सूक्ष्म बाबीकडे लक्ष द्यावे लागते, शेतीसाठी शिक्षणाचा कसा उपयोग करता येईल हे त्यांचे काम प्रत्यक्षात बघितल्यावर कळते. संस्थेने सुरु केलेल्या कृषी विज्ञान केंद्रात माती परीक्षण, अन्न, धान्य, फळे यांसह पर्यावरणातील विविध विषयांवर विद्यार्थी व इतर क्षेत्रातील मान्यवर संशोधन करत असतात. संस्थेच्या माध्यमातून कुक्कुटपालन, शेळीपालन, मत्सपालन, मधमाशी पालन, बायोगॅस निर्मिती, गांडुळखत निर्मिती, आयुर्वेदिक वनस्पती लागवड, मोत्यांची शेती, फुल शेती हे सर्व विदेशी तंत्रज्ञान वापरून विकसित करण्यात आले आहे. येथे दरवर्षी देश-विदेशातील जवळपास दोन लाखांहून अधिक शेतकरी व इतर मान्यवर भेटी देतात. येथील शेती तंत्रज्ञानाचा अभ्यास करून प्रशिक्षण घेऊन त्याचा प्रत्यक्षात अवलंब करतात. या कारणामुळे देशात शेतीचा बारामती पॅटर्न प्रसिद्ध आहे. आज जवळपास ११० एकर क्षेत्रात ही संस्था डौलाने व दिमाखात उभी आहे व कृषी क्षेत्रातील मैलाचा दगड बनली आहे. ADT’S INSTITUTE OF EXCELLENCE FOR GENETIC IMPROVEMENT या संस्थेद्वारे गाई-म्हशींचे क्रॉस ब्रीडिंग करत मोठया प्रमाणात दुध उत्पादन करणाऱ्या संकरित प्रजाती निर्मिती करण्यास प्राधान्य दिले जाते. तसेच याठिकाणी विदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करण्यात येते. Agriculture Development Trust Atal Incubation Center (ADT-AIC) अंतर्गत शेतीविषयक उद्योग व तत्सम यांना प्रोत्साहन देण्यासाठी व नवीन उद्योग (start up) सुरु करण्यासाठी विद्यार्थ्यांना सहकार्य करण्यात येते. आज पर्यंत म्हणजे जवळपास अडीच वर्षाच्या कालावधीत ३२ उद्योग यशस्वीपणे उभे राहिले आहे. ADT- शारदानगर येथे ग्रामीण भागातील मुलींसाठी निवासी वसतिगृह सुरू करण्यात आले असून सुमारे साडेतीन हजारांहून अधिक विद्यार्थिनी या वसतिगृहात राहून ह्याच संस्थेच्या वेगवेगळ्या क्षेत्रात प्राविण्य मिळवीत आहेत. संस्थेला दिलेल्या भेटी दरम्यान खासदार सुप्रियाताई सुळे व सौ. सुनेत्रा वहिनी यांच्याशी संवाद साधला. त्यांचे अगत्य आणि प्रेम नेहमीच मला प्रोत्साहन देणारे असते. तो अनुभव त्यांच्या बाबतीत पुन्हा घेता आला. पवार कुटुंबियांच्या इतर संस्थेप्रमाणेच बारामती विद्या प्रतिष्ठान या संस्थेचे शैक्षणिक क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय काम आहे. देशभरातील विद्यार्थी या प्रतिष्ठानमध्ये शिक्षण घेत आहेत. याचे सर्व व्यवस्थापन राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, सौ. सुनेत्रा वहिनी व आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे या यशस्वीपणे सांभाळत आहेत. खरंतर, बारामतीच्या माझ्या या अभ्यास दौऱ्याचा योग हा श्री. राजेंद्र पवार साहेबांच्या पत्नी सौ. सुनंदा वहिनी म्हणजेच आमदार रोहित पवारांच्या आई ह्यांच्यामुळे आला. त्यांच्याशी बोलताबोलता असे कळले की, त्या गेल्या पंचवीस वर्षापासून बारामती परिसरातील महिलांसाठी उल्लेखनीय काम करत आहेत. बचत गटांच्या महिलांच्या हाताला काम देऊन ते सर्वदूर पोहोचावे, त्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी याकरिता त्यांनी स्वतः लक्ष घालून पुण्यात ‘भीमथडीची’ यात्रा सुरू केली. त्यामुळे केवळ पुणे परिसरातीलच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील महिला बचत गटांना चालना मिळाली. आज त्यांनी या परिसरात मोठया प्रमाणात महिलांचे जाळे निर्माण करत प्रशिक्षण देत उद्योग व्यवसाय सुरु करण्यास मदत केली आहे. सौ.सुनंदा वहिनींने महिलांच्या आरोग्यविषयक, कौटुंबिक, आर्थिक समस्या यांचे योग्यरीत्या निराकरण करून त्यांना सक्षम केले आहे. बारामतीमध्ये चाललेले त्यांचे हे काम तर 'शहाणे करून सोडावे अवघे जन...' या उक्तीप्रमाणेच मला वाटले. आता हेच काम त्या अहमदनगर जिल्ह्यातील रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड या मतदारसंघातील दुष्काळी भागात मोठया जिद्दीने लोकसहभागाच्या माध्यमातून करत आहेत. शासकीय योजना व वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांच्या माध्यमातून पाणी अडवा, पाणी जिरवा यांसह विविध योजना त्या यशस्वीपणे राबवीत आहेत. या दौऱ्यात सुनंदा वहिनींच्या घरी जाण्याचा योग आला. त्यांच्यातील एक सजक समाजकारणी तिथेही दिसत होता. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या त्यांच्या निवासस्थानी बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या 'धाबळ’ने आपले लक्ष वेधून घेतले. कष्टकरी महिलांनीच बनविलेल्या वस्तू सुशोभीकरणासाठी वापरल्या आहेत त्या अधिक आकर्षक वाटल्या. सुनंदा वहिनींनी केलेले आदरातिथ्य, दिलेले प्रेम आणि सुग्रास जेवण यांचा आनंद आम्ही घेतला. त्यांचा साधेपणा, सहज सर्वांमध्ये मिसळून जाण्याचा गुण, मनात कोणताही संकोच न ठेवता दुसऱ्यांसाठी स्वतःला झोकून देण्याचा स्वभाव, मनाला स्पर्श करणारा होता. निघताना शेवटी त्यांना येवल्याची खास पैठणी, मी स्वतः केलेले एक पेंटिंग व मांगल्याचे प्रतीक म्हणून तुळशीचे रोप भेट दिले. या प्रवासातला एक आणखी महत्त्वाचा भाग म्हणजे 'वस्तुसंग्रहालय' होय. पवारसाहेबांनी आजवर पन्नास वर्षांच्या आयुष्यात राज्य आणि देश पातळीवर जीजी पदे भूषविली, त्या पदांवरून काम करीत असताना त्यांचे देशात आणि परदेशात असंख्य दौरे झाले. त्या-त्या ठिकाणी त्यांना मिळालेल्या भेटवस्तू आणि इतरही सन्मान, पुरस्कार यांचे हे संग्रहालय आहे. एखादा माणूस आपल्या आयुष्यामध्ये हिमालयाएवढे काम कसे उभे करू शकतो; याची जाणीव हे संग्रहालय देते. हे सर्व बघतांना त्यांनी केलेल्या अलौकिक कार्याचा पट डोळ्यासमोर उभा राहतो. नव्या पिढीला या संग्रहालयाच्या पाहणीतून प्रेरणा मिळावी, हे ह्या संग्रहालय उभे करण्यापाठीमागचा उद्देश होय. 'माझे काहीही नाही जे आहे ते आपले सर्वांचे...' हीच भावना या वस्तुसंग्रहालयातून फिरताना जाणवते. अरे हो……विशेष म्हणजे या सर्व भेटी दरम्यान गार्गी, आनंद तसेच विविध संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी यांनी केलेलं मार्गदर्शन, आदरातिथ्य आम्हाला अधिक भावले. त्यांच्या या सर्व उल्लेखनीय कामांचा ठेवा मनात साठवून, खूप काही शिकून मी व माझ्या सहकाऱ्यांनी बारामतीचा निरोप घेतला. राजकारणाच्या पलीकडे जाऊन समग्र समाजाच्या प्रगतीचा विचार करणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून मा. शरदचंद्र पवार साहेब सर्वांना माहीत आहेत; पण गेल्या पन्नास वर्षांत त्यांनी लावलेल्या एका रोपट्याचा हा जो ज्ञानवृक्ष बहरला आहे; त्याच्या सावलीत येणाऱ्या कित्येक पिढ्या विसावतील. नव्या दिशेने प्रवास करतील आणि पवार साहेबांच्या दूरदृष्टीला नमस्कार करतील. आम्हीही त्यांच्या कर्तृत्वापुढे नतमस्तक होऊन नाशिककडे निघालो.... एक मोठे ज्ञानसंचित घेऊन.... - डॉ. शेफाली भुजबळ



3 views0 comments

Comments


bottom of page